* नगर – मागील आठवड्यात गावातील रेशन दुकानात झालेल्या चोरी प्रकरणी पोलिसांना नावे सांगितल्याच्या संशयावरून ७ ते ८ जणांच्या टोळक्याने तंटामुक...
*
नगर – मागील आठवड्यात गावातील रेशन दुकानात झालेल्या चोरी प्रकरणी पोलिसांना नावे सांगितल्याच्या संशयावरून ७ ते ८ जणांच्या टोळक्याने तंटामुक्ती अध्यक्षाच्या घरावर दगडफेक करत घरातील महिलांना मारहाण केली. त्यावेळी त्यांच्या मदतीला गेलेल्या सरपंचाच्या मुलावर कोयत्याने हल्ला करून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना नगर तालुक्यातील खांडके गावात शुक्रवारी (दि.२७) रात्री घडली.
या हल्ल्यात सरपंच चंद्रकला चेमटे यांचा मुलगा किरण यमाजी चेमटे हे जखमी झाले असून त्यांनी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना दिलेल्या जबाबावरून नगर तालुका पोलिसांनी ७ जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. अनिकेत राजेंद्र ठोंबे (वय १९), निखील सुभाष ठोंबे, साहिल सुभाष ठोंबे, गणेश सुभाष ठोंबे, गौतम रामदास ठोंबे (सर्व रा. खांडके, ता.नगर) तसेच त्यांच्या सोबत पुण्याहून आलेला एक अनोळखी तरुण अशी आरोपींची नावे आहेत. यातील अनिकेत राजेंद्र ठोंबे व अन्य एक अशा दोघांना पोलिसांनी शनिवारी (दि.२८) अटक केली असून बाकीचे पसार झाले आहेत.
खांडके गावात मागील आठवड्यात रेशन दुकानात चोरी झाली होती. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा ही दाखल झालेला आहे. या गुन्ह्यात सदर आरोपींचा सहभाग असल्याची माहिती तंटामुक्ती अध्यक्ष भगवान ठोंबे यांनी पोलिसांना दिली असल्याचा संशय या आरोपींना होता. या संशयावरूनच सर्व आरोपींनी शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास भगवान ठोंबे यांच्या घरावर दगडफेक केली. तसेच त्यांची आई व मुलींना मारहाण करू लागले. त्यातील एका मुलीने मदतीसाठी किरण चेमटे यांना फोन केला. ते तात्काळ तेथे गेले असता त्यावेळी आरोपींनी त्यांच्याकडे पाहत हरामखोरा तु सुद्धा मागील वेळेस सप्ताह चालू असताना आमच्यावर गुन्हे दाखल केले होते. आता जर तु भांडण सोडवायला आला तर तुलाही खतम करून टाकू अशी धमकी दिली.
त्यावेळी यातील चौघेजण किरण चेमटे यांच्या अंगावर धावून गेले व त्यांना पकडले. त्यावेळी आरोपी अनिकेत राजेंद्र ठोंबे म्हणाला तु सुद्धा काल भगवान ठोंबे बरोबर माझ्यावर गुन्हा दाखल करायला पोलीस स्टेशन मध्ये गेला होता. थांब आता तुला खलास करून टाकतो असे म्हणत किरण यांच्यावर कोयत्याने वार केला. तो त्यांनी हुकवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या डोक्याच्या उजव्या बाजूला लागला. तर एकाने डोक्यात लाकडी दांडके मारून जखमी केले.
तसेच जाताना सर्व आरोपींनी यापुढे आमच्या नादी लागले तर बीडच्या मस्साजोग पेक्षा वाईट हालत करू अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी ७ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे. पुढील तपास स.पो.नि. प्रल्हाद गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे हे करीत आहेत.
*सर्व आरोपींना अटक न केल्यास गाव रस्त्यावर उतरणार*
खुनी हल्ला होवून २ दिवस झाले असून पोलिसांनी फक्त २ आरोपींना पकडले आहे. इतर सर्व आरोपींना तातडीने अटक करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. अन्यथा सर्व गाव रस्त्यावर उतरेल असा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे.

COMMENTS